" देवशयनी , आषाढी एकादशी"
लेखक :
डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे
हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात – शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील. त्यातील सर्वात महत्त्वाची एकादशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशी, जिला देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी किंवा हरि शयनी एकादशी असे म्हटले जाते.
हिंदू धर्मात मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपतात आणि चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. या कालावधीत चातुर्मास सुरू होतो, ज्यामध्ये धार्मिक व्रते, जप-तप, संयमाचे पालन केले जाते.
या चार महिन्यांत शुभकार्य टाळली जातात, कारण विष्णू निद्राधीन असतात. असे म्हणतात की भगवान रुद्र कारभार सांभाळतात . आणि यामुळेच अतिशय शिस्तीत जीवन जगत राहणे हाच एक पर्याय असतो . या काळात नैसर्गिक संकटे , पुर , आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात कारण सगळी कडे पाऊस पडत असतो आणि वातावरण दमट असते . सूर्यनारायणाचा दर्शन फार कमी वेळा होते. आणि त्यामुळे वातावरणात सूक्ष्म जीव, किटाणू ,विषाणू असतात . त्यामुळे उपवास सांगितला आहे. तसेच अन्न ,पाणी ,वस्त्र, निवारा याबद्दल विशेष लक्ष देऊन असले जीवन सुखमय, आनंदमय करण्याचा मार्ग आपल्या शास्त्रात पुराणात सांगितला आहे.
ते कार्तिक शुद्ध एकादशी – म्हणजेच खानदेशात त्याला खोपडी बारस म्हणतात. प्रबोधिनी एकादशीला पुन्हा जागे होतात.
याच्या नंतर चार महिने शक्तीचे असतात. त्यामध्ये योग ,प्राणायाम ,ध्यान ,धारण, सात्विक आहार आणि व्यायाम अवलंब करून शरीरात शक्ती आणि निर्माण करण्याची वेळ असते . त्यामुळें संपूर्ण वर्षभर शरीर शक्तीमय, ऊर्जा मय राहते.
पंढरपूरची वारी – भक्तीचे प्रतीक:
देवशयनी आषाढी एकादशी म्हटली की वारकरी परंपरा आठवते. लाखो भाविक "ज्ञानोबा-तुकोबा"च्या पालख्या घेऊन पंढरपूरकडे वारी करतात.
विठोबा, म्हणजेच श्रीकृष्ण किंवा विष्णू, यांचे दर्शन घेण्यासाठी हा भक्तीचा महासागर या दिवशी पंढरपूरात एकवटतो.
या दिवशी एकच गजर आसमंतात घुमतो –
"विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!"
एकादशीचे व्रत व उपवास:
या दिवशी भक्त उपवास, जागरण, हरिपाठ, कीर्तन, नामस्मरण करतात. हे सर्व मन, शरीर आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी केले जाते.
या दिवसातून आपल्याला संयम, श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध आचरणाचे महत्त्व समजते.
आपले जीवनही विठ्ठलाच्या चरणी अर्पण करून आपण ही चातुर्मासाची वेळ आत्मशुद्धीसाठी, आत्मविकासासाठी वापरू शकतो.
Comments
Post a Comment