संघर्ष, गैरसमज आणि माझी भारतीयता


डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे 


संघर्ष माझ्यासाठी कधीच नवीन नव्हता. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वळणावर संघर्ष माझ्या समोर उभा राहिला. प्रत्येक वेळी त्याने माझी परीक्षा घेतली; पण मी त्याचे भीतीने नव्हे, तर अभिमानाने आणि आनंदाने स्वागत केले. कारण मला ठाऊक होते की संघर्ष माणसाला घडवतो, त्याला अधिक सक्षम, संयमी आणि परिपक्व बनवतो.


वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षापासून मी हिंदुत्वाचा प्रचार-प्रसार, भारतीय संस्कृतीचा अभ्यास आणि भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन व प्रसार करण्याचा प्रयत्न करत आलो आहे. हा प्रवास कधीच सोपा नव्हता.


जेव्हा माझ्या वयाची मुले खेळण्यात रमायची, तेव्हा मी कीर्तन, भजन आणि संतवाङ्मय ऐकण्यात आनंद शोधत होतो. त्यावेळी मित्र, शेजारी आणि नातेवाईक मला "भजन्या" म्हणायचे.


स्वदेशी विचारवंत राजीव दीक्षित यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी गोसेवेच्या कार्यात सहभागी झालो. तेव्हा काहींनी मला "गुराखी, ढोरक्या "  म्हणून हिणवले.


भारतीय पंचांग, ज्योतिष, ग्रह-तारे आणि भारतीय ज्ञानपरंपरेचा अभ्यास करू लागलो, तेव्हा काहींनी मला "ब्राह्मण" म्हणून संबोधले. संगीताची आवड जोपासण्यासाठी तबला शिकू लागलो, तेव्हा "तबलजी, तमासगीर" असेही म्हणाले.


हिंदुत्व, भारतीय संस्कृती आणि भारतीय ज्ञानपरंपरेच्या कार्यात प्रत्येक टप्प्यावर काही विरोधक निर्माण झाले, तर अनेक जिवाभावाचे मित्रही मिळाले. हे सर्व या प्रवासाचाच एक भाग आहे. प्रत्येकाने माझ्याकडे आपल्या दृष्टीने पाहिले, आपापली लेबले लावली; पण मी मात्र माझ्या ध्येयापासून कधी विचलित झालो नाही.


आज मनाला वेदना संघर्षामुळे होत नाहीत. संघर्ष तर माझा जुना सोबती आहे. वेदना होतात त्या आपल्या माणसांकडून होणाऱ्या गैरसमजांमुळे. बाहेरच्या लोकांचा विरोध सहन करणे सोपे असते; पण ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो, त्यांच्याच मनात आपल्या विषयी शंका निर्माण झाल्या की मनाला वेदना होतात.


तरीही माझ्या मनात कोणाबद्दल कटुता नाही. कारण मला विश्वास आहे की सत्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आवाज चढवावा लागत नाही; काळच त्याचा सर्वात मोठा साक्षीदार असतो. आजचे गैरसमज उद्या दूर होतील, पण आपण केलेले प्रामाणिक कार्य कायम स्मरणात राहील.


आजपर्यंत मी जे काही केले, ते कोणाविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी नाही, तर भारतीय संस्कृती, भारतीय ज्ञानपरंपरा आणि राष्ट्रभक्तीची मूल्ये समजून घेण्यासाठी आणि समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी केले आहे. माझ्याशी सर्वजण सहमत असतीलच असे नाही; मतभेद असू शकतात. पण माझ्या प्रामाणिकपणावर आणि निष्ठेवर माझा पूर्ण विश्वास आहे.


माझी ओळख कोणत्याही एका पदाने, जातीने किंवा उपाधीने होत नाही. माझी खरी ओळख म्हणजे माझी भारतीयता.


भारतीयता माझ्या विचारांत आहे, माझ्या संस्कारांत आहे आणि माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे. जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत ज्ञान, संस्कृती, सेवा, राष्ट्रप्रेम आणि सत्याच्या मार्गावर चालत राहणे, हीच माझी साधना आणि हीच माझी जीवनयात्रा राहील.

Comments

Popular posts from this blog