आमचा गावातील दसरा!* (बालपणीच्या आठवणी)
*आमचा गावातील दसरा!*
(बालपणीच्या आठवणी)
*@ जितेंद्र आत्माराम होले पुणे*
‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असा हा सण विजयादशमी म्हणजेच दसरा हा संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. शारदीय नवरात्र संपताच येणारा सण किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी असणारा सण म्हणजे दसरा होय.
माझ्या लहानपणी आम्ही दसऱ्याचा सण अतिशय आनंदात उत्साहात साजरा करायचे.
वर्षातील चार मुहूर्तांपैकी एक महत्वाचा दिवस. सकाळी लवकर अभ्यंग स्नान करून घराच्या ओट्यावर बसून बाहेरील गंमत बघण्याचा आनंद वेगळाच. सकाळच्या वेळी प्रसन्न आल्हाददायक वातावरण , थंड हवा निरभ्र आकाश अशा वेळी गावातील घराघरातील चैतन्य काही वेगळेच. घराघरांमध्ये प्रत्येक जण कामात व्यस्त. प्रत्येक घराच्या अंगणात तुलसी जवळ गाईच्या शेणानं अंगण स्वच्छ सारवलेले. दिवा लावलेला, सुंदर रांगोळी काढलेली. घराघरांमध्ये गुहिणी स्वयंपाक, पूजा, भजन, घरकाम शेतीची कामे करण्यात व्यस्त. सूर्यनारायण चं मनमोहक दर्शन मनाला प्रसन्न करीत असे. सकाळीच आई आम्हाला दूध चहा व नाष्टा द्यायची. मग आम्ही मित्र मिळून क्रिकेट, लपाछपी, लंगडी, कबड्डी, तळ्यात मळ्यात,विटीदांडू, लगोरी असे विविध प्रकारचे खेळ खेळायचो. दुपारी आई जेवणासाठी बोलवायची. तेव्हा आमचा खेळ भंग व्हायचा व आम्ही आपापल्या घरी जायचो. दुपारी जेवणानंतर घरातील खेळ खेळायचो. दुपारी ३.०० वा . नंतर चुलत भाऊ व काका सोबत शेतामधून, ज्वारीचे कणीस असलेले धांडे ( झाड) व आपट्याची पाने ,माती घरी घेऊन यायचो. घरी आल्यावर आई दारावरच उभे राहून माझी डोक्यात टोपी घालून व शेतातून आणलेल्या वस्तूंची पूजा करायची. पायावर पाणी टाकायची . नंतर घरात येऊन प्रथम घरातल्या देव्हाऱ्यात एक धांडा, आपट्या ची पान व माती ठेवायचो. नंतर मग क्रमाने आमची कुलदेवता मनुदेवी मंदिरात, ग्रामदेवता कामसिद्ध मंदिरात , हनुमान , राम मंदिरात जाऊन दिवा व प्रत्येकी एक धांडा व आपट्याची पान , माती ठेऊन पूजा करायचो. शेवटी मग शेतावर जाऊन दिवा व पूजा करायचो. आमचे दोन्ही शेत हे अगदी गावाजवळच रोडला लागून असल्यामुळे आम्हाला शेतात जाण्याचे फार कष्ट पडत नव्हते. मग घरी आल्यावर मस्त आंघोळ करून छान नवीन कपडे घालून, तयारी करून मग गावात पाया पडण्यासाठी म्हणजे मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी व आपट्या चे पान म्हणजे सोन वाटण्यासाठी मोठ्या आनंदाने प्रसन्नतेने निघायचो. आधी बस स्टँड जवळ असलेल्या काकांच्या घरी मग गावातील काकांच्या घरी व मग गावातील प्रतिष्ठित व्यक्ती च्या घरी जायचो. खूप मजा ,उत्साह वाटायचा. मग शेवटी शेजारील घरी जायचो. मग शेवटी घरी आल्यावर आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन जेवणाला बसायचो . सण असल्यामुळे घरी पंच पक्वान्न असायचे . वडील शिक्षक असल्यामुळे त्यांचे आजी माजी विद्यार्थी काही शेजारी व आमचे चुलत बंधू,काका घरी आशीर्वाद घेण्यासाठी यायचे. खूप गप्पा गोष्टी चालायच्या. खूप छान नवीन गमती जमती व आनंद यायचा. ते अविस्मरणीय क्षण,प्रसंग होते. आज भौतिक विज्ञान युगात या आनंदापासून वंचित राहावे लागते हे दुःख वाटते.
Comments
Post a Comment