कार्तिकी एकादशी / खोपडी बारस*
*कार्तिकी एकादशी / खोपडी बारस*
*डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे*
खानदेशामध्ये खोपडी बारस म्हणजे अतिशय आनंददायक भावनिक उत्त्सव . कुटुंबातील सर्व लहान थोर पुरुष महिला सर्व मंडळी एकत्र येतात. व हा सण मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करतात. अंगण स्वच्छ गाईच्या शेणानं सारवून सुंदर रांगोळी काढतात.घरामध्ये कुलदैवतेसाठी नैवद्य तयार केला जातो. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर पूजेला सुरवात होते. अंगणात रांगोळी काढलेल्या ठिकाणी पाच उसाचे झाड वरच्या बाजूने बांधून खोपडीच्या आकार तयार करण्यात येतो त्यावर स्वच्छ कपडा बांधल्यानतर त्यामध्ये खाली जामिनावर पाट टाकून त्याच्यावर स्वच्छ कपडा ठेवतात.
अशी मान्यता आहे की आषाडी एकादशी पासून देव झोपलेले असतात व कार्तिकी एकादशीला देवाला उठविण्यासाठी घरातील देव हे घराच्या बाहेर काढून त्या खोपडी मध्ये ठेवतात व त्यांची पूजा करतात. त्यानंतर सर्व पुरुष मंडळी त्या खोपडीच्या भोवती गोलाकार अकरा फेऱ्या मारतात. प्रत्येकाने हातात एक वाद्य किंवा घरातील ताट किंवा ज्यातून आवाज येईल अशी वस्तू वाजवून देवाला जागृत करतात . कुटुंबातील सर्वात लहान मुलाला खोपडीत बसवून दूध प्यायला देतात नंतर त्याला देवाचा अंश मानून संपूर्ण वर्षभरात घडणाऱ्या घडामोडी, शेतीमाल ,पीक व जीवनावश्यक वस्तूंचे भाव विचारले जातात. तो लहान मुलगा त्याच्या ज्ञानानुसार प्रश्नांची उत्तरे देतो. सर्व मंडळी अतिशय आनंदाने प्रसन्नतेने,प्रेमाने त्या मुलाचे उत्तर एकतात आणि हसतखेळत पूजेची सांगता करतात.
Comments
Post a Comment