श्रीकृष्ण यात्रा - एक अप्रतिम स्वर्गीय अनुभव*
*श्रीकृष्ण यात्रा - एक अप्रतिम स्वर्गीय अनुभव*
(मथुरा - जन्म स्थळ - गोकुळ - नंदगाव - बरसाना - गोवर्धन - वृंदावन - इंद्रप्रस्थ - हस्तीनापूर - सांदीपनि ऋषीआश्रम उज्जैन - मुल द्वारका - द्वारका - बेट द्वारका - गोपी तलाव - भालकातीर्थ ( वैकुंठ गमन) )
डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे
निवांत वेळ होता .सभोवतालचे वातावरण भक्तिमय होते . आम्ही देहू आळंदी च्या बरोबर मध्ये राहतो माझ्या घरापासून १० km देहू आणि १२ km आळंदी त्यामुळे नेहमीच भक्तिमय वातावरण असते. मनात विचार आला भगवान श्रीकृष्णाचा अवतार प्रवास झाला ते ठिकाण आपण बघायचे मग आम्ही ठरविले की जन्म ते निर्वाण व मध्ये केलेले कार्यक्षेत्र येथे प्रवास करायचा आणि दर्शन घ्यायचे . शक्य होईल तसे ठिकाण बघायचे .
मग आम्ही सुरवात केली श्रीकृष्णाच्या जन्मस्थनापासून म्हणजे मथुरे पासून . मथुरेला जन्मस्थळी दर्शन करून तिथले विविध ठिकाणांना भेट दिल्या . मथुरे चा पेढा ,रबडी, कचोरी चा स्वाद घेत आम्ही पुढील प्रवास म्हणजे गोकुळात निघालो. गोकुळात नंदबाबा यशोदा माई च्या घरी घेलो दर्शन घेतले व तिथली गोशाळा बघितली . तिथून आम्ही नंदगाव , बरसाना म्हणजे राधा राणीचे गाव , वृंदावन येथे रासक्रीडा स्थळी, यमुना तीरावर व अनेक श्रीकृष्ण स्थळी भेट दिली. तिथून आम्ही गोवर्धन परिक्रमेला निघालो . ऑटो च्या माध्यमाने आम्ही गोवर्धन परिक्रमा पूर्ण केली.
आता आम्ही विचार केला की श्रीकृष्णाच्या बालपणाच्या ठिकाणी भेट दिली.आता आपण त्यांच्या शिक्षण घेतलेल्या ठिकाणी म्हणजे संदिपणी ऋषींच्या आश्रमात जाऊ. पण तो आश्रम उज्जैन मध्यप्रदेश मध्ये आहे . मग आम्ही विचार बदलला आणि इंद्रप्रस्थ, हस्तीनापुर म्हणजे आजचे दिल्ली येथे आलो . तिथे पांडवांचा जुना किल्ला बघितला. आणि मग आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. काही दिवस गेले आता उत्सुकता होती संदीपणी ऋषी आश्रम बघण्याची मग आम्ही यात्रा सुरू केली.
प्रथम नर्मदा किनारी ओंकारेश्वर ,ममलेश्वर, उज्जैन महाकाल, व विविध तीर्थस्थान बघत आंही संदीपनी ऋषी आश्रम बघितला. तिथं क्षिप्रा नदीवर नतमस्तक झालो. तिथून परत इंदोर मार्गे घरी आलो.
आत्ता विचार केला द्वारका , बेट द्वारका चे प्लॅनिंग केले. सौराष्ट्र एक्सप्रेस ने द्वारका येथे पोहचलो. तिथून आधीच प्लॅनिंग प्रमाणे हॉटेल ला सामान ठेवले फ्रेश झालो आणि संध्याकाळी द्वारकाधीश च्या दर्शनासाठी निघालो.
द्वारका सप्त पुरींपैकी एक. अतिशय सुंदर अप्रतिम अविस्मरणीय अनुभव. गोमती नदी आणि समुद्र देवता यांच्या संगम आणि तिथे भगवान श्रीकृष्णाचा खापरपंतू श्री वज्रनाभ याने बांधलेले मंदिर. भारतीय वास्तू शास्त्र कला ,गणित ,विज्ञान तंत्रज्ञान याचा अभूतपूर्व संगम. द्वारकेला आल्यावर आधी गोमती मातेचे दर्शन घेऊन द्वारकाधीशाचे दर्शन घेतात. गोमती मातेच्या अतिशय स्वच्छ पाण्यात मास्याना अन्न खाऊ घातल्यानंतर समोर असलेल्या लक्ष्मी नारायणा चे अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि त्यामध्ये पांडवांनी बांधलेली पुरातन विहीर आहे त्यामध्ये पाणी गोड आहे . हा निसर्गाचा चमत्कार आहे की सगळी कडे खारे पाणी आहे पण विहिरीला गोड पाणी. तिथून दुर्वास कुंड , श्रीहरी कुंड तसेच मुख्य मंदिरात द्वारकाधीश सोबत देवकी माता , प्रद्युम्न, अनिवृद्ध , राधा राणी, जांबुवंती , रुखमनी ,सत्यभामा व इतर अनेक मंदिर आहे. आणि तिथे घेल्यानंतर शंकराचार्य मठ व त्यातील पंचायतन मंदिर व इतर मंदिर अप्रतिम स्वर्गीय आहे. द्वारकाधीश मूर्ती अतिशय सुंदर अप्रतिम विलोभनीय आहे. दर्शन झाल्यानंतर सगळा थकवा , दुःख , त्रागा नाहीसा होतो आणि एक अप्रतिम ऊर्जा अनुभवास येते.
दुसऱ्या दिवशी सकाळी आणि खाजगी वाहनाने बेट द्वारका येथे निघालो . रस्त्यात दारुका वनातील नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे तिथे नतमस्तक झालो तिथे पिंडिजवळ जाऊन पूजा केली . बाहेर महादेवाची भव्य अशी विलोभनीय मूर्ती आहे. तिथून आम्ही गोपी तलाव येथे गेलो.
गोपी तलाव हे मध्यम आकाराचे तलाव आहे जे द्वारकेपासून बेट द्वारकेच्या मार्गावर सुमारे 20 किमी अंतरावर आहे. तलावामागील कथा आपल्याला भगवान कृष्णाच्या बालपणात परत घेऊन जाते जेव्हा वृंदावनातील गोपींनी त्यांचा आदर केला होता. जेव्हा कृष्णाने आपली राजधानी द्वारकेला हलवली तेव्हा गोपींना त्याचा वियोग सहन झाला नाही. ते द्वारकेत त्यांना भेटायला आले आणि शरद पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी रास केला. रास झाल्यावर त्यांनी या भूमीच्या मातीत प्राण अर्पण केले आणि भगवान श्रीकृष्णात विलीन झाले. येथील माती पिवळ्या रंगाची बारीक आणि गुळगुळीत आहे आणि असे मानले जाते की त्यात दैवी गुणधर्म आहेत जे अनेक रोग बरे करू शकतात, विशेषत: त्वचेशी संबंधित. आज अनेक पर्यटक गोपी चंदन या नावाने प्रसिद्ध असलेली ही माती त्यांच्या भेटीचे प्रतीक म्हणून खरेदी करतात. गोपी तलावाच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर स्नानासाठी घाटांनी बनलेला आहे आणि त्याभोवती अनेक देवळे आहेत. मासे आणि पक्ष्यांच्या अनेक प्रजाती येथे आढळतात त्यामुळे छायाचित्रणासाठी उत्तम वातावरण निर्माण होते.
तिथून आम्ही बेट द्वारका येथे निघालो . पूर्वी येथे बोटीने प्रवास होता. पण आता इथे भव्य असा पुल ब्रिज बांधलेला आहे त्याचे नाव सुदर्शन पुल असे आहे . प्रसन्न वातावरण भक्तिमय वातावरणात आम्ही बेट द्वारका येथे प्रवेश केला तिथे आम्ही द्वारकाधीश निवास स्थान तिथे असलेल्या अष्ट भार्यांचे मंदिर , सोन्याची द्वारका ,मकरद्वाज हनुमान मंदिर, ,चोऱ्यांशी यज्ञ कुंड मंदिर , गायत्री माता मंदिर अशी प्रमुख मंदिरांचे दर्शन घेऊन आम्ही द्वारकेला परत निघाले रस्त्यात रुक्मिणी मंदिर आहे तिथे दर्शन घेतले मध्ये रस्ता समुद्र बीच वर जेवण केले व परत हॉटेल ला परत आलो . दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही प्रथम ज्योतिर्लिंग सोमनाथ येथे जाण्यास निघालो. रस्त्यामध्ये मुल द्वारका येथे दर्शन घेतले . तिथे पुरातन विहीर व मंदिर आहे. तिथे भगवान श्रीकृष्ण द्वारका नगरी रचना करण्यापूर्वी राहत होते. तिथून आम्ही पोरबंदर म्हणजे सुदामापुरी येथे आलो. तिथे सुदामाचे मंदिर म्हणजे घर बघितले व महात्मा गांधींचे घर व वस्तु संग्रहालय बघितले. तिथून आम्ही पोरबंदर समुद्र किनारा येथे आलो. भव्य दिव्य असा समुद्र किनारा. आणि किनाऱ्यालगत अतिशय भव्य दिव्य राजवाडा . माझ्या आयुष्यातील एवढा भव्य राजवाडा प्रथमच दर्शनास आला. जर हा राजवाडा दर्शनास मोकळा केला तर जगातील भव्य प्रशस्त वस्तू पैकी एक होईल एवढा भव्य राजवाडा . पण तो ओसाड अवस्थेत आहे. तिथून आम्ही भालकातिर्थ येथे पोहचलो. आम्ही आमच्या यात्रेतील शेवटचा टप्पा आला होता. ह्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण झाडाखाली विश्रांती करत असताना शिकाऱ्याने बाण मारला . आणि येथेच भगवान श्रीकृष्ण वैकुंठ धामाले गेले. ते ठिकाण बघितले आणि संपूर्ण द्वारकाधीश चा प्रवास डोळ्यासमोर आला. अतिशय भव्य दिव्य कार्य करणारा, गीते सारखं ज्ञान देणारा. जगाचा मार्गदर्शक येथून वैकुंठाला गेला . आमच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. आणि शेवटी मनात विचार आला एवढा द्वारकाधीश पण एकटाच स्वधामा ला गेला आपण तर कुठेच नाही.
त्यानंतर आम्ही सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी गेलो. संध्याकाळ होती अतिशय प्रसन्न आनंदी वातावरण होते .समुद्र किनारा भव्य असा कोरीडोर बांधलेला आहे समुद्रातील थंड हवा भव्य असा लेझर शो , विविध प्रकारच्या लाईट ,प्रकाश याचे एकत्रीकरण यामुळे येथेच स्वर्ग असल्याचा अनुभव येतो . प्रचंड शी ऊर्जा अनुभवास येते. येथील वातावरण ऊर्जा शक्ती शब्दात वर्णन करता येत नाही. अनुभव हा एकच पर्याय आहे. तिथून दुसऱ्या दिवशी आम्ही दीव बेटावर समुद्र किनारी फिरायला आलो. आणि तिथून विमान मार्गे प्परातीच्या मार्गास निघालो.
Comments
Post a Comment