माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

 *माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*


लेखक - डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे (PhD) 


संध्याकाळची वेळ होती कुंभमेळ्याच्या बातम्या बघत होतो. आणि मनात एक विचार आला की आपण महाकुंभ प्रयाग राज येथे जायला पाहिजे आणि माझी कित्येक वर्षाची इच्छा पण होती की कुंभमेळा बघायला पाहिजे. तिथे साधू संत महात्मे यांचे दर्शन घ्यायला पाहिजे. ठरलं!! कुंभ मेळयाला जायचे . आता तीन पर्याय होते , बस ,रेल्वे, आणि विमान . पण बस आणि रेल्वे ने दोन दिवस जायला व दोन दिवस यायला म्हणजे चार दिवस गेले असते. मग मी मित्रांना व आमच्या घरच्यांना विचारले पण काहीतरी अडचणी समोर आल्या आणी त्यांचे रद्द झाले .मग मी ठरविले की विमानाने जायचे व यायचे आणि त्याप्रमाणे मी आखणी केली की पुणे ते काशी व काशी ते प्रयाग राज आणि प्रयाग राज ते पुणे असा मार्ग होता. पण डायरेक्ट फ्लाईट नव्हती. म्हणून कनेक्टिंग फ्लाईट बुक केली. पुणे ते हैद्राबाद व हैद्राबाद ते काशी असा प्रवास झाला. काशी वाराणाशी विमानतळावरून आय आय टी बी एच यू मध्ये आमच्या मित्रांनी गेस्ट हाऊस मध्ये राहण्याची सोय केली होती. त्याप्रमाणे मी तिथे पोहोचलो अतिशय भव्य दिव्य अशी राहण्याची व्यवस्था होती. माझा मित्र आय आय टी मध्येच नोकरीला आहे तो मला भेटण्यासाठी आला होता . त्याच्यासोबत चहा नाष्टा घेत खूप गप्पा मारल्या. त्यांनी माझी व्ही आय पी दर्शनाची व्यवस्था केली होती व सोबत एक माहिती असणाऱ्या एका माणसाची व्यवस्था केली . आताशी संध्याकाळचे पाच वाजले होते . मी त्या माणसाला घेऊन काशी विश्वनाथच्या दर्शनाला निघालो. आय आय टी बी एच यू चा भव्य दिव्य सुंदर परिसर बघत व पंडित मदन मोहन मालवीय यांचे कार्य व ऋण व्यक्त करत आम्ही मंदिरात पोहचलो . दर्शनाची व्यवस्था केली असल्यामुळे सहज दर्शन झाले . पण तिथे असलेल्या माकडांनी माझे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर भव्य दिव्य नंदी महराजांचे दर्शन झाले पण मंदिराच्या विरुद्ध बाजूला नंदीचे तोंड होते त्याचे तोंड हे ज्ञानव्यापी मशिदी कडे होते. तेंव्हा तिथे मला समजले की पुरातन मंदिर हे मस्जिद बाजूला होते . त्यानंतर मी काशी विश्वनाथ चे दर्शन घेतले . त्यानंतर आम्ही दशाष्वमेध घाटावर गंगा आरतीकरिता निघालो . प्रचंड अशी गर्दी होती. माता गंगेच्या काठी पोहचलो . आयुष्यात प्रथमच गंगा मैयाचे दर्शन झाले. आणि माता गंगेला नमन करून गंगेच्या पाण्यात उतरलो . नंतर नावेने गंगा आरती साठी योग्य ठिकाणी गेलो . आरती संपल्यावर काशीच्या प्रसिद्ध रबडी जिलेबी चा आस्वाद घेतला आणि मग उत्तम अश्या हॉटेल मध्ये जेवणाचा आस्वाद घेतल. नंतर गेस्ट हाऊसला परत आलो. अत्यंत आधुनिक सुविधा होत्या. थंडी असल्यामुळे मी हिटर लावून टी व्हि बघत कॉफीचा आस्वाद घेत उद्या सकाळचे प्लॅन करत सोबत्याला सांगितले की सकाळी चार, पाच वाजताच मला घ्यायला ये . त्याप्रमाणे आम्ही सकाळीच आंघोळीसाठी अस्सी घाटावर गेलो. अतिशय स्वच्छ सुंदर निर्मळ ,थंड गार पाणी होते . थंडी असल्यामुळे हुडहुडी भरली होती. गंगेच्या पाण्यात उतरलो . आणि एक डुबकी मारली आणि सर्व थंडी गायब झाली. सोबत आणलेल्या तांब्या च्या पाण्याने आंघोळ केली आणि पाच ते सहा डुबकी मारून गंगा मैयाचा जयजयकार करीत भगवान विश्वनाथ ची पूजा केली. त्यानंतर होडीने आम्ही घाट दर्शनासाठी निघालो. 

हा अनुभव अप्रतिम अविस्मरणीय होता!!! . होडीमध्ये एक पंडित माहिती सांगण्यासाठी होता त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने सर्व घाटांची माहिती सांगितली व मधेच तो भजन ,चित्रपट संगीत तो अतिशय उत्तम गात होता . अस्सी घाट , दशास्वमेध घाट ,श्रीराम घाट, मनकर्निका घाट, हरिश्चंद्र घाट, पातळेश्वर घाट , असे अनेक घाट बघत शेवटी नमो घाट चे दर्शन करून परत दशाश्र्वामेध घाटावर उतरून तिथून आम्ही बाहेर पडलो. आता खूपच भूक लागली होती तिथे प्रसिद्ध असलेल्या कचोरी पूरी भाजीचा आनंद घेत आम्ही भगवंताच्या अस्तित्वाचा अपार दिव्यात्वाचा अनुभव व आनंद घेत होतो. त्यानंतर आम्ही मां अन्नपूर्णा देवी च्या दर्शनाला गेलो त्यानंतर भगवान काळभैरवाचे दर्शन घेतले . असे म्हणतात काशीच्या रक्षक काळभैरव आहे त्यांचे दर्शन घ्यायलाच पाहिजे आणि प्रत्यक्ष पार्वती माता ही अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात तिथे वास्तव्यास आहे.  

झाले , अतिशय उत्तम दर्शन झाले .मी माझ्या सोबात्याला सांगितले की मला प्र्याग राज येथे जायचे आहे तर मला बस स्टँड वर सोड . व त्याप्रमाणे मी बस प्रवास करून प्रयाग राज येथे पोहचलो.

आता दुपारचे तीन वाजले होते . आणि शहरापासून पंधरा किलोमीटर आधीच पोलिसांनी गाडी थांबविली. तिथून पुढे पायी चालत जावे लागेल असे आदेश आले. मी इंटरनेट वर बघत होतो माझे निवासाचे हॉटेल २० किलोमीटर . मला टेन्शन आले पण काय करणार ? तसाच पुढे लोकांच्या गर्दीमध्ये चालू लागलो . देवाचे नामस्मरण करीत चालत होतो . पुढं नशिबाने एक टू व्हीलर ओला वाला भेटला . त्याला मी तयार केले . तो तिथला निवासी असल्यामुळे त्याने मला बरोबर माझ्या हॉटेल मध्ये पोहचवले. हॉटेल मध्ये मी फ्रेश झालो. थोडा आराम केला आणि विचार केला आजची संध्याकाळ आणि रात्र आहे ,कुंभमेळा बघून येऊ.मग मी आमचे भारतीय शिक्षण मंडळ चे प्रचारक व मित्र श्री गोविंद गिरीजी महाराजांच्या आखाड्यात होते तिथे त्यांची भेट घेतली . व रात्रीची आखड्यांची सुंदर अप्रतिम अविस्मरणीय भव्य दिव्य रचना मांडणी बघत मी संगमावरील पुलावरून फिरू लागलो . त्यानंतर हॉटेल मध्ये गेलो. जेवण केल्यानंतर आराम करताना विचार केला. सकाळी लवकरच स्नान करण्यासाठी जायचे . 

सकाळी २.३० वाजताच मला जाग आली. मी आंघोळीसाठी कपडे घेतले व रात्रीच निघालो रिक्षाने ३.१५ ला पोहचवले. बरोबर सकाळी ३.३० वाजता संगमात प्रवेश केला . अतिशय स्वच्छ सुंदर, अविस्मरणीय भव्य दिव्य असे वातावरण होते. गुलाबी थंडी होती, गार हवा, थंड गार पाणी आणि लोकांचं प्रचंड विश्वास उत्साह अश्या मंत्रमुग्ध वातावरणात पाण्यात प्रवेश केला . 

असे म्हणतात सकाळच्या ब्रम्हमुहुर्तावर देवी ,देवता , यक्ष, गंधर्व, पुण्यवान साधू ,सन्यासी ,मानव हे आंघोळ करतात. म्हणून त्या प्रहरी प्रचंड ऊर्जा असते. प्रसन्न ,आनंददायक वातावरण असते. मला सुद्धा ब्रम्ह मुहुर्तावर आंघोळ करायची होती आणि त्या ऊर्जेचा अनुभव घ्यायचा होता. 


पहिली डुबकी घेतली. आणि जय गंगे ,जय यमुने ,जय सरस्वती मातांच्या नावाचा जयजयकार केला. त्यानंतर मी असे एकले होते की पाण्यामध्ये भगवान श्री विष्णू असतात तेंव्हा पाण्यात गेल्यानंतर श्री विष्णू चे स्मरण केले. महादेवाचे स्मरण केले नंतर सर्व देवी देवता,निसर्ग देवता, स्थान देवता ,ग्रामदेवता , कुलदेवता ,कुलदेवी, ,पितर ब पूर्वजांचे स्मरण करून संगमात स्नान केले. अविस्मरणीय अनुभव होता. 

त्यानंतर लेटे हुए हनुमानाचे दर्शन घेतले. तोपर्यंत सकाळचा प्रकाश पडला होता. आणि मध्यवर्ती संगमावर जाण्याकरिता बोट तयार झाल्या होत्या . बोटीने संगमच्या मध्यवर्ती ठिकाणी गेलो. सकाळचे प्रसन्न वातावरण होते आणि मध्यवर्ती संगमावर स्नानाची उत्तम व्यवस्था केली होती. परत आंघोळीसाठी पाण्यात उतरलो. आता सूर्यनारायण पण उगवले होते. थंड गार स्वच्छ शुद्ध पाणी , कोवळा सूर्य प्रकाश, गार हवा आणि आध्यत्मिक मंत्रमुग्ध वातावरणात परत डुबकी घेतली . आता पाण्यात परत श्री विष्णूचे स्मरण केले व सूर्य नारायणाला अर्ध अर्पण केले. ऊर्जेचा अनुभव आला. मनात भावनिक , आध्यत्मिक स्मृती होत्या. कोणताही भौतिक विचारांचे स्मरण नव्हते. खरच १४४ वर्षानी आलेल्या कुंभमेळ्याची ऊर्जा आणि संगम स्थानी माझी उपस्थिती , माझा स्वतः विश्वास बसत नव्हता. पण काही तरी पुण्यकर्म केले असेल म्हणून मला हा योग आला. असा विचार करून आम्ही परत बोटीने निघालो. रस्त्यामध्ये त्यांनी आम्हाला अक्षय वटवृक्षाचे दर्शन घडविले . आणि मनात विचार आला की याच ठिकाणी ब्रम्हदेव , श्रीराम ,श्री हनुमान जी आले होते. धन्य वाटले

 आणि प्रसन्न होऊन काठावर आलो . 

आता खूप भूक लागली होती. काठावरच नाष्टा केला . व परत जायला लागलो तर एका महात्म्याचे दर्शन झाले. तेजस्वी, उर्जायुक्त , ध्यानात बसलेले ते सिद्ध दिसले . त्यांना भौतिक जगाचे थोडेही स्मरण नव्हते . ते ध्यानात बसले होते . पण त्यांच्या चेहऱ्यावरील तेज त्यांचे दर्शन घेण्यास प्रवृत्त करत होते. त्यांचे दर्शन घेतले व हॉटेल मधे गेलो. तिथे जेवण करून परत कुंभमेळा क्षेत्रातील साधू सन्यासी संत यांच्या दर्शनासाठी निघालो. 

आताशी सकाळचे अकरा वाजले होते आणि माझ्याकडे संपूर्ण दिवस आणि रात्र होती. मी अतिशय उत्साहाने कुंभमेळ्याचे दुकाने ,विविध प्रकारच्या वस्तू,खाद्य पदार्थ, अलग अलग समूहाच्या माध्यमातून आलेले भाविक , भव्य दिव्य तंबू, त्याच्या वर असलेल्या शोभेच्या वस्तू, विविध प्रकारचे छोटे छोटे आध्यामिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, रस्त्यावर साधूंचे भजन, गायन, व अनेक प्रकारच्या लोकांचे श्रध्देने केलेले उपक्रम बघत मी संगमावर पोहचलो. एकूण २५ सेक्टर होते. आणि प्रत्येक सेक्टर मध्ये अनेक आखाडे होते. संगमाच्या दोन्ही बाजूला आखाडे होते.मी सुरवातीला सेक्टर २० मध्ये असलेल्या निरंजनी आखाड्यात प्रवेश केला.

प्रथम दर्शनी नागा साधूंचे दर्शन झाले.मग त्यांची कुटी , यज्ञ मंडप, यज्ञ स्थळ व साधना स्थान बघत आणि आश्चर्य चकित होऊन अप्रतिम देखावा बघत होतो आणि त्यांची मुलाखत ,विचार , ज्ञान ऐकत होतो . आणि सनातन धर्माची शास्त्रोक्त , वैज्ञानिक आधारावर असलेले जीवन पद्धती बघून अभिमान वाटला. 

तिथले रुद्राक्षांपासून तयार केलेले बारा ज्योतिर्लिंग व विविध प्रकारच्या शोभा बघत दुसऱ्या जुना आखाडा येथे प्रवेश केला नंतर बडा आखाडा, गुरू गोरक्ष आखाडा, दत्तात्रेय आखाडा, कार्तिकेय, श्री गणेश , शक्ती, सतपंथ आखाडा बघत संध्याकाळ झाली होती. आणि भूक पण लागली होती तिथेच जेवण केले व पुन्हा ताजेतवाने होऊन पुन्हा दर्शनासाठी निघालो .

अनेक कथ वाचक , योगी, संत ,महात्मे , स्वामी योगानंद ,हिमालयातील योगी , साधू सन्यासी , स्वामी यांचे आश्रम होते. पण वेळ कमी होता आणि मला जास्तीत जास्त बघायचे होते .


 पण नाईलाज होता कारण रात्रीचे ११.०० वाजले होते आणि मी पण खूप थकलो होतो. आता इच्छा नसतानाही रूम वर जावे लागणार म्हणून अंतिम संगमाचे दर्शन घेतले व तिथली पवित्र माती डोक्याला लावली आणि अतिशय जड अंतःकरणाने हॉटेल मध्ये पोहचलो. 

रात्री लगेच झोप आली आणि सकाळी ९.०० वाजता जाग आली. मी विचार केला होता की परत संगम स्नान करायचे पण गर्दी बघून व माझ्या फ्लाईट चा वेळ बघून न जाण्याचा निर्णय घेतला. सकाळचे जेवण हॉटेल मध्येच केले . ओला बुक करून प्रयाग राज विमान तळावर पोहोचलो . खरच अतिशय स्वच्छ्ता, शिस्त होती . माझी इंडिगोची फ्लाईट कंनेक्टिंग होती . प्रयाग राज ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे .  

आम्ही फ्लाईट मध्ये बसलो तर आमच्या विमानाचा मुख्य कॅप्टन आदरणीय श्री राजीव प्रताप रूढी हे होते. एवढा मोठा मंत्री,ज्ञानी, श्रीमंत माणूस पण फक्त भाविकांची सेवा करण्याकरिता हे कार्य करत होते . त्यांनी सर्वांची ओळख करून घेतली. व विमानामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने माहिती सांगितली . विमान कुठल्या प्रदेशातून जात आहे त्याचं महत्व असे अनेक विषय त्यांनी त्या प्रवासात सांगितले. त्याच्याबद्दल आमच्या मनात एक आदर निर्माण झाला. पुढे दिल्ली वरून पुणे ची फ्लाईट होती, आम्ही इंडिगो फ्लाईट ने पुणे येथे सुखरूप पोहचलो. 

 अविस्मरणय अविश्वसनीय प्रवासाच्या आठवणीत धुंद होऊन घरात पोहचलो.

Comments

Popular posts from this blog

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*